जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील त्यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात फूट पडू नये, म्हणून हा मोठा निणर्य घेतल्याचे म्हटले जात आहे. जपानचं पब्लिक ब्रॉडकास्टर 'एनएचके'ने रविवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इशिबा यांच्या एलडीपी नेतृत्वाखालील युतीने वरिष्ठ सभागृहात आपले बहुमत गमावले. या अपयशामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत आहे.
शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय का घेतला?६८ वर्षीय इशिबा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच पंतप्रधान पदाचा भार स्वीकारला होता. अवघ्या वर्षभराच्या आताच त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. एका वर्षाच्या आतच त्यांनी देशाच्या दोन्ही सभागृहात बहुमत गमावले आहे. गेल्या एका महिन्यापासून त्यांना त्यांच्याच पक्षाच्या उजव्या विचारसरणीच्या गटातून विरोध होत आहे. जुलैमध्ये, इशिबा यांच्या सत्ताधारी युतीला मोठा धक्का बसला होता. एका महत्त्वाच्या संसदीय निवडणुकीत २४८ जागांच्या वरिष्ठ सभागृहात बहुमत मिळवण्यात त्यांची युती अपयशी ठरली, ज्यामुळे त्यांच्या सरकारची स्थिरता आणखी कमकुवत झाली.
या निवडणुकीनंतर, पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेण्यासाठी इशिबा यांच्यावर दबाव वाढू लागला. आतापर्यंत इशिबा यांनी माघार घेण्यास नकार दिला होता. पण, आता त्यांनी हार मानल्याचे दिसत आहे. इशिबा यांच्या या निर्णयाची वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. सोमवारी, त्यांचा लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष लवकरच नवीन नेतृत्वासाठी निवडणुका घ्यायच्या की नाही हे ठरवणार आहे. जर पक्षाच्या या अंतर्गत निवडणुकीत नवीन नेतृत्वाची मागणी मंजूर झाली असती, तर तो इशिबा यांच्याविरुद्ध एक प्रकारचा अविश्वास प्रस्ताव ठरला असता. मात्र, यापूर्वीच इशिबा खुर्ची सोडताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, जपानचे कृषी मंत्री आणि माजी पंतप्रधान यांनी शनिवारी रात्री इशिबा यांची भेट घेतली आणि त्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास सांगितले. गेल्या आठवड्यात, हिरोशी मोरियामा यांच्यासह एलडीपीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. इशिबा यांच्या सरकारने गेल्याच आठवड्यात अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम केला होता.