इस्रायलचे माजी पंतप्रधान ओलमर्ट यांना सहा वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: May 14, 2014 03:14 IST2014-05-13T18:13:12+5:302014-05-14T03:14:26+5:30
इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांना रिअल इस्टेटच्या एका प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, इस्रायलच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानपदासारखे वरिष्ठ पद भूषविलेल्या नेत्याला अशी शिक्षा झाली आहे.

इस्रायलचे माजी पंतप्रधान ओलमर्ट यांना सहा वर्षांची शिक्षा
तेल अवीव- इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांना रिअल इस्टेटच्या एका प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, इस्रायलच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानपदासारखे वरिष्ठ पद भूषविलेल्या नेत्याला अशी शिक्षा झाली आहे.
बदनाम माजी पंतप्रधान ओलमर्ट यांना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. शिक्षा झालेल्या प्रकरणात होली लँड नावाच्या जागेसंदर्भात भ्रष्टाचार झाला आहे. ओलमर्ट यांना ३० हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
न्या. डेव्हिड रोसन यांनी ६८ वर्षांचे ओलमर्ट यांना मार्चच्या अखेरीस भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात दोषी ठरविले होते. जेरुसलेम येथील होलीलँड प्रॉजेक्टच्या विकासकाकडून, ओलमर्ट यांनी जेरुसलेमचा मेयर म्हणून काम करताना १ लाख ६० हजार डॉलर घेतल्याचा आरोप आहे. जे लाच देतात ते भ्रष्ट असतात; पण जे स्वीकारतात ते देशाची प्रतिष्ठा डागाळतात व जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी करतात. जनतेचा सेवक जर लाच स्वीकारत असेल तर तो देशद्रोही ठरतो, असे न्या. रोसन यांनी निकाल जाहीर करताना म्हटले आहे. या प्रकरणात सात जणांना शिक्षा सुनावण्यात आल्या असून, त्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, दंड दहा हप्त्यांत द्यायचा आहे. ओलमर्ट यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत.