Israeli PM Netanyahu: गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे जग दोन भागांमध्ये वाटलं गेलं आहे. इस्त्रायलने केलेल्या हजारो हल्ल्यांमुळे पॅलेस्टाईन उद्ध्वस्त झाला आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही देशांबाबत जगातल्या राष्ट्रानी सहानुभूती दर्शवली. दुसरीकडे, नुकतीच ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिली. या निर्णयानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधाला न जुमानता युके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून मान्यता दिली. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने आधीच हा निर्णय घेतला होता, तर युकेने रविवारी यासंदर्भातील निर्णय घेतला. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी रविवारी सांगितले की त्यांचा देश पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून औपचारिकपणे मान्यता देत आहे. ब्रिटनच्या या निर्णयावर नेतन्याहू यांनी विरोध दर्शवत पॅलेस्टाईनला मान्यता देणे हे दहशतवादासाठी एक मोठे बक्षीस असल्याचे म्हटलं.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते शोश बदरोसियन यांनी पत्रकार परिषदेत घेत यावर भाष्य केलं. "पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले आहे की युरोपीय राजकीय गरजांमुळे पॅलेस्टाईनला एक देश म्हणून स्वीकारून आमचा देश आत्महत्या करणार नाही. पॅलेस्टाईन कधीही एक देश बनू शकत नाही. पॅलेस्टाईनला मान्यता देणे हे दहशतवादासाठी एक मोठे बक्षीस आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी आणखी एक संदेश आहे तो म्हणजे हे होणार नाही. पॅलेस्टाईन राज्य स्थापन होणार नाही," असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
स्टारमर यांना त्यांच्या निर्णयासाठी इस्रायल व्यतिरिक्त, त्यांच्या स्वतःच्या लेबर पार्टीचाही विरोध असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, स्टारमर यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत आमचे ध्येय पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसाठी आशा पुनर्संचयित करणे आहे. आमच्या या निर्णयाचा अर्थ हमासला मिळालेले बक्षीस म्हणून मिरवू नये. पॅलेस्टिनी लोकांच्या भविष्यातील कारभारात हमासची कोणतीही भूमिका राहणार नाही, असं केयर स्टारमर म्हणाले.
स्टारमर यांच्या या घोषणेची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. जुलैमध्ये स्टारमर यांनी, जर इस्रायलने गाझामध्ये युद्धबंदी मान्य केली नाही किंवा संयुक्त राष्ट्रांची मदत पोहोचू दिली नाही आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही तर ब्रिटन पॅलेस्टिनींना मान्यता देईल, असं म्हटलं होतं.