इसिसचा शस्त्रतज्ज्ञ ठार
By Admin | Updated: January 31, 2015 23:34 IST2015-01-31T23:34:14+5:302015-01-31T23:34:14+5:30
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा रासायनिक शस्त्रतज्ज्ञ मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

इसिसचा शस्त्रतज्ज्ञ ठार
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा रासायनिक शस्त्रतज्ज्ञ मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मागच्या शनिवारी (२४ जानेवारी) इराकमधील मोसूलनजीक करण्यात आलेल्या या हल्ल्यात ठार झालेला अबू मलिक हा इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या काळात रासायनिक शस्त्रांचा तज्ज्ञ म्हणून काम करीत होता. हा तज्ज्ञ मारला गेल्याने इसिस या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या राजवटीत अबू मलिक हा रासायनिक शस्त्रास्त्र कारखान्यात कामाला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी तो २००५ मध्ये इराकमधील अल-काईदा या संघटनेत दाखल झाला होता. अबू मलिक ठार झाल्याने रासायनिक शस्त्रास्त्रे तयार करून त्याचा वापर करण्याची इसिसची क्षमता कमी झाली आहे.अबू मलिक सलिह जसिम मोहंमद फलाह अल-सबावी या नावानेही ओळखला जायचा. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे घातक रासायनिक शस्त्र तयार करण्यात सक्षम असल्याची त्याची ओळख तयार झाली होती.(वृत्तसंस्था)