काबूल : काबूल विमानतळावर दहशतवादी संघटना आयसिसने राॅकेट हल्ला करून अमेरिकन विमानांना लक्ष्य केले. अमेरिकेन सैन्य माघारीची अखेरच्या टप्प्यातील उड्डाणे सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र, त्यात काेणत्याही प्राणहानीचे वृत्त नाही. तर, अमेरिकेने काबुलमध्ये रविवारी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. या कारवाईमुळे तालिबानचा तीळपापड झाला असून ही कारवाई चुकीची असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
अमरिकेने रविवारी ड्राेनचा वापर करुन काबूलमध्ये एअर स्ट्राईक केला हाेता. त्यात आयसिसच्या खाेरासान गटाच्या आत्मघाती हल्लेखाेरांना लक्ष्य करण्यात आले हाेते. त्यानंतर आयसिसने काबूल विमानतळावर एका कारमधून राॅकेट हल्ला केला. अमेरिकेच्या संपूर्ण माघारीसाठी एकच दिवस शिल्लक असताना आयसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकन विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. विमानतळाजवळून ५ राॅकेट डागले. अमेरिकन सैन्याचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी या घटनेला दुजाेरा दिला आहे.
पुरुष शिक्षकांनी मुलींना शिकविण्यावर बंदी
मुलामुलींनी एकत्र सहशिक्षण घेण्यावर तालिबानने बंदी आणलीच होती. आता पुरुष शिक्षकांनी मुलींना शिकवण्यासही तालिबानने प्रतिबंध केला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ताधाऱ्यांचे उच्च शिक्षणमंत्री शेख अब्दुल बाकी हक्कानी यांनी सांगितले की, शरियत कायद्याप्रमाणेच आमच्या देशातील शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण दिले जाईल.
नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेण्याची मोहीम
अफगाणिस्तान कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदावे यासाठी नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेण्याची मोहीम तालिबानने सुरू केली आहे. तालिबानी नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आले असले तरी त्यांना विरोध करणारा मोठा वर्ग तिथे आहे.