Elon Musk TikTok News: ट्विटर ही लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यानंतर स्पेसएक्स आणि टेस्लाचे कंपनीचे प्रमुख एलन मस्क हे टिकटॉक अॅप विकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण, एलन मस्क यांनी टिकटॉक विकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. टिकटॉक हा शॉर्ट व्हिडीओसाठी लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. चिनी कंपनीच्या अॅपवर भारतात बंदी घातलेली आहे, तर अमेरिकेत त्याच्या सुरक्षेबद्दल सातत्याने चर्चा होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
WELT Economic Summit मधील एका सत्रात एलन मस्क व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे सहभागी झाले. त्यात त्यांनी टिकटॉक खरेदी करण्याची योजना नसल्याचे सांगितले. एलन मस्क यांचा यासंदर्भातील व्हिडीओ समोर आला आहे.
मी टिकटॉक वापरत नाही...
एलन मस्क म्हणाले, "मी टिकटॉक वापरत नाही. या प्लॅटफॉर्मबद्दल मला जास्त माहिती नाही. खरंतर टिकटॉकसाठी मी कोणतीही बोली लावलेली नाही. ना माझ्याकडे हे खरेदी करण्यासंदर्भातील काही योजना आहे. जर माझ्याकडे टिकटॉक असते, तर मी त्याचे अल्गोरिदम समजून घेण्याचा प्रयत्न केला असता आणि हे बघितले असते की, ते किती हानिकारक आहे आणि किती उपयोगी आहे."
एलन मस्क यालाच जोडून पुढे म्हणाले की, "मग आम्ही त्याला उत्पादकता वाढवणारे आणि माणसांसाठी फायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केले असते. हानिकारक ठरण्याऐवजी कोणतीही गोष्ट अधिक फायदेशीर करण्याच्या बाजूने काम केले पाहिजे. मी व्यक्तिगत टिकटॉक वापरत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त काही माहिती नाही."
"मला कधी कधी एक्सवर (ट्विटर) टिकटॉकचे व्हिडीओ दिसतात किंवा कुणीतरी मला दाखवतात. पण, मी ते खरेदी करण्याचा विचार करत नाहीये", असे त्यांनी सांगितले.
मग एलन मस्क यांनी ट्विटर का खरेदी केलं?
ट्विटर खरेदी करण्याबद्दल मस्क म्हणाले, "ट्विटर खरेदी करणे माझ्यासाठी असामान्य होतं. खरंतर मी कंपन्या सुरू करतो; खरेदी करत नाही. मी ट्विटर यामुळे खरेदी केलं कारण मला वाटलं की, मानवतेच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. मग भलेही ते कठीण आणि वेदनादायी ठरले असेल. पण, टिकटॉकच्या बाबतीत हा तर्क लागू होत नाही. मी गोष्टी केवळ आर्थिक कारणांमुळे खरेदी करत नाही. त्यामुळे टिकटॉक खरेदी करण्यासाठी माझा स्पष्ट उद्देश नाहीये."