इरावन मंदीर बाँबस्फोट - बँकॉक पोलीसांनी केलं टर्कीच्या नागरिकाला अटक
By Admin | Updated: August 29, 2015 17:41 IST2015-08-29T17:12:52+5:302015-08-29T17:41:25+5:30
इरावन या हिंदू मंदीराजवळ १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी पोलीसांनी एका विदेशी नागरिकाला अटक केले आहे

इरावन मंदीर बाँबस्फोट - बँकॉक पोलीसांनी केलं टर्कीच्या नागरिकाला अटक
>ऑनलाइन लोकमत
बँकॉक (थायलंड), दि. २९ - इरावन या हिंदू मंदीराजवळ १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी पोलीसांनी एका विदेशी नागरिकाला अटक केले आहे. या प्रकरणातला हा पहिला संशयित अटक झाला आहे. अटक करण्यात आलेला २२ वर्षांचा तरूण टर्की किंवा तुर्कस्थानचा रहिवासी असून त्याच्याकडे बाँब बनवण्यासाठी, त्याचा स्फोट घडवण्यासाठी लागणारे साहित्य होते तसेच त्याच्याकडे जवळपास १२ पासपोर्ट होते अशी माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे. एका व्यक्तिकडे १२ पासपोर्ट का असावेत असा प्रश्नही त्यांनी विचारला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
बँकॉकमधल्या गजबजलेल्या परीसरात असलेल्या या इरावन या ब्रह्मदेवाच्या मंदीरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने हिंदू व बौद्ध भाविक येतात. या मंदीराजवळ १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा बाँबस्फोट घडवण्यात आला त्यात २० जण ठार झाले होते. गेल्या अनेक वर्षातला हा थायलंडमधला पहिलाच दहशतवादी हल्ला होता.
पोलीसांनी स्थानिक मलाय वंशाचे मुस्लीम बंडखोर, चीनशी समझोत्यातून २० उघूर मुस्लीमांना परत पाठवल्याने चिडलेले उघूर मुस्लीमांचे गट अशा अनेकांची या प्रकरणी चौकशी सुरू ठेवली होती. दरम्यान, एका विदेशी नागरिकाला बाँब बनवण्याच्या साहित्यासह ताब्यात घेतल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्हीच्या फुटेजमध्ये दिसलेला तरूण व ताब्यात घेतलेला तरूण एकच आहेत का याचाही तपास सुरू आहे. थायलंडमधल्या पर्यटन उद्योगाची हानी करण्याच्या उद्देशाने बाँबस्फोट घडवण्यात आल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला असून थायलंडच्या शत्रूंचा हात आहे का या अंगानेही तपास होत आहे.
जवळपास १२ दिवसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक झाल्यामुळे या बाँबस्फोटाच्या तपासाला दिशा मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.