मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण आणि क्रूर वळणावर पोहोचले आहे. इराणने इस्त्रायलच्या नागरी वस्त्यांवर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवत मोठी तबाही माजवली आहे. विशेषतः इस्त्रायलचे अणू केंद्र असलेल्या डिमोना आणि शेजारील अराद शहराला इराणने लक्ष्य केले असून, या हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले असून, त्यांनी इराणला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे.
लहान मुलांवर हल्ले म्हणजे 'युद्ध अपराध'
इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "इराणी राजवटीने जाणीवपूर्वक अराद आणि डिमोनामधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. लहान मुलांसह १०० हून अधिक निष्पाप लोक जखमी झाले आहेत. हा केवळ हल्ला नसून हा 'युद्ध अपराध' आणि 'दहशतवाद' आहे," अशा शब्दांत मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. अराद शहराचे महापौर यायर मायान यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती इतकी गंभीर आहे की सुमारे १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
'ही रात्र कठीण आहे, पण आम्ही लढू' - नेतन्याहू
पंतप्रधान नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर तातडीने अरादच्या महापौरांशी चर्चा केली आणि जखमींबद्दल संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "आमच्या भविष्यातील मोहिमेतील ही एक अत्यंत कठीण संध्याकाळ आहे. मी सर्व सरकारी मंत्रालयांना तातडीने मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही सर्व आघाड्यांवर शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत." नेतन्याहू यांनी आणीबाणीच्या काळात बचाव दलांना आणखी बळकट करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
अणू केंद्राजवळ मोठा धोका!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इराणचे एक क्षेपणास्त्र डिमोना शहरात पडले आहे. डिमोना हे इस्त्रायलच्या अणू सुविधांचे मुख्य केंद्र मानले जाते. या संवेदनशील भागाला लक्ष्य केल्यामुळे आता इस्त्रायल इराणवर महाभयंकर पलटवार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि यायर लॅपिड यांनीही या घटनेचा निषेध करत, हा संपूर्ण देश एकजुटीने या संकटाचा सामना करेल असे म्हटले आहे. सध्या इस्त्रायलमधील हॉस्पिटल्स जखमींनी भरली असून सर्वत्र बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Web Summary : Iran attacked Israel, targeting Dimona's nuclear facility and Arad, injuring over 100 civilians, including children. Israel vows retaliation, calling it a 'war crime.' Hospitals are overwhelmed as rescue operations intensify.
Web Summary : ईरान ने इस्राइल पर हमला किया, डिमोना परमाणु केंद्र और अराद को निशाना बनाया, जिसमें बच्चों सहित 100 से अधिक नागरिक घायल हो गए। इस्राइल ने जवाबी कार्रवाई की कसम खाई, इसे 'युद्ध अपराध' कहा। बचाव कार्य तेज होने से अस्पताल भर गए हैं।