Iran Israel War: इस्रायल आणि इराणमधीलयुद्ध अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी संध्याकाळी इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले हे युद्ध आता वाढत चालले आहे. इराण आणि इस्रायल दोघेही एकमेकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे ज्यामुळे लष्करी, अणु आणि ऊर्जा सुविधांचे तसेच मानवी जीविताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दोन्ही देश आक्रमक
रविवारी संध्याकाळपर्यंत मृतांचा आकडा वाढला होता. इस्रायलने इशारा दिला होता की, वाईट परिस्थिती ओढवू शकते. इस्रायलने तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला आणि इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. तर इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देत इस्रायलच्या काही मोठ्या शहरातील इमारतींवर हल्ला केला होता. त्यामध्ये तेल अवीवमधील IDF तळ आणि हैफामधील गॅस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
कोणत्या देशात किती बळी?
इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अॅडोम बचाव सेवेनुसार, रविवारी इराणी हल्ल्यानंतर देशात एकूण मृतांची संख्या १४ झाली आहे. याशिवाय, देशाचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई क्षेत्र तिसऱ्या दिवशीही बंद राहिले. दुसरीकडे इस्रायलने इराणच्या अणु आणि ऊर्जा स्थळांना तसेच नागरी इमारतींना लक्ष्य केले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की शुक्रवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर २२४ लोकांचा मृत्यू झाला. एजन्सीने सांगितले की १,२७७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि ९० टक्क्यांहून अधिक जखमी लोक हे सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. अहवालांनुसार, या हल्ल्यांमध्ये सुमारे ३० इराणी लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांचा मृत्यूही झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले...
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे की, इराण आणि इस्रायलमध्ये निश्चितच शांतता प्रस्थापित होईल. दोघांनाही तडजोड करावी लागेल. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडचा तणाव मी संपवला. त्याचप्रमाणे हे युद्धही लवकरच संपेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.