भारतात गुंतवणुकीची संधी
By Admin | Updated: August 17, 2015 23:47 IST2015-08-17T23:47:32+5:302015-08-17T23:47:32+5:30
भारतात ताबडतोब एक ट्रिलियन (एकावर १८ शून्ये) डॉलर गुंतवणुकीची संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

भारतात गुंतवणुकीची संधी
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) : भारतात ताबडतोब एक ट्रिलियन (एकावर १८ शून्ये) डॉलर गुंतवणुकीची संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.मसदर शहरात सोमवारी ते गुंतवणूकदारांच्या बैठकीत बोलत होते. मोदी म्हणाले,‘‘माझ्या सरकारकडे वारशाने काही प्रश्न आले आहेत. यापूर्वीच्या सरकारांनी निर्णय न घेणे आणि त्यांच्या सुस्तावलेपणामुळे ज्या गोष्टी तुंबून पडल्या त्यांना चालना देणे हे माझ्या सरकारचे प्राधान्याचे काम आहे.’’
संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) गुंतवणूकदारांना ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले ते सोडविण्यासाठी मी माझ्या वाणिज्य मंत्र्यांना पाठवीन, असेही ते म्हणाले. भारतात परवानग्यांसाठी एक खिडकीसारखे उपाय योजावेत, असे गुंतवणूकदारांनी मोदी यांना सांगितले. भारतात व्यवसाय करण्यासाठी कंटाळवाण्या व गुंतागुंतीच्या प्रक्रियेला तोंड द्यावे लागते, अशीही तक्रार त्यांनी केली. यावर मोदी यांनी हे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन त्यांना दिले. मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उद्योजकांनी व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार हे धोरणात्मक भागीदार म्हणून हवे असते, कारण गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची सुरक्षितता हवी असते, असे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)