इंटरनेट स्मार्ट फोनमध्ये चीन भारताच्या पुढे
By Admin | Updated: March 20, 2017 01:19 IST2017-03-20T01:19:02+5:302017-03-20T01:19:02+5:30
इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या

इंटरनेट स्मार्ट फोनमध्ये चीन भारताच्या पुढे
वॉशिंगटन : इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
प्यू रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७१ टक्के चिनी उत्तरदात्यांनी आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. भारतात मात्र, केवळ २१ टक्के उत्तरदात्यांनीच आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. चीनमधील ६८ टक्के उत्तरदात्यांकडे मोबाइल फोन असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. याउलट भारतात केवळ १८ टक्के उत्तरदात्यांकडेच स्मार्ट फोन असल्याचे दिसून आले. २0१६ च्या वसंतात हे सर्वेक्षण करण्यात आले.
२0१३ नंतरच्या काळात चीनमध्ये स्मार्ट फोन असलेल्या नागरिकांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली. भारतात हे प्रमाण फक्त ६ टक्के राहिले. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार चीनमधील ९८ टक्के नागरिकांकडे किमान मोबाइल फोन आहेत. भारतात मात्र, मोबाइल फोन असलेल्यांची संख्या ७२ टक्केच आहे.
माध्यमिक शिक्षण घेतलेल्या १0 पैकी सुमारे ४ भारतीयांकडे (३८ टक्के) स्मार्टफोन आहे. त्याखाली शिक्षण असलेल्या भारतीयांत हे प्रमाण फक्त ९ टक्के आहे. उत्पन्नातील तफावतीमुळे ही दरी दिसून आली आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या पातळीवरही स्मार्ट फोनच्या बाबतीत मोठा फरक दिसून आला. चीनमधील ७२ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ६३ टक्के आहे. भारतात मात्र, केवळ २९ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत. ग्रामीण भागात तर केवळ १३ टक्के नागरिकांकडेच स्मार्ट फोन आहेत.
प्यूने म्हटले की, स्मार्ट फोनच्या मालकीबाबत भारतात स्त्री-पुरुषांतही भेद दिसून आला. २३ टक्के भारतीय पुरुषांकडे स्मार्टफोन आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत हे प्रमाण १४ टक्केच आहे. (वृत्तसंस्था)