बचावलेल्या मुुलीने दिली दुर्घटनेची माहिती
By Admin | Updated: January 4, 2015 01:42 IST2015-01-04T01:42:11+5:302015-01-04T01:42:11+5:30
अमेरिकेतील लियॉन प्रांतात. विमान अपघातातून सुदैवाने बचावलेल्या ७ वर्षांच्या अमेरिकन मुलीचे धाडस चकित करणारे आहे.

बचावलेल्या मुुलीने दिली दुर्घटनेची माहिती
कुटुंबीयांचा मृत्यू : विमानाच्या अवशेषातून बाहेर पडत रात्रभर तुडवले जंगल
न्यूयॉर्क : दैवी चमत्कारासोबत शोकांतिकेचा प्रत्यय देणारी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली अमेरिकेतील लियॉन प्रांतात. विमान अपघातातून सुदैवाने बचावलेल्या ७ वर्षांच्या अमेरिकन मुलीचे धाडस चकित करणारे आहे. फ्लोरिडाहून इलिनोईसकडे जाणाऱ्या पाईपर-पीए-३४ या विमानात ती आई-वडिलांसोबत होती. इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाने नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. नंतर हे विमान लियॉन प्रांतांतील एका जंगलात कोसळले. विमानाचे तुकडे-तुकडे झाले. या दुर्घटनेत तिच्या आई-वडिलांसह चौघांचा मृत्यू झाला. सुदैवाने ती बचावली. हा दैवी चमत्कारच.
तुकडे-तुकडे झालेल्या विमानाच्या अवशेषातून स्वत:हून बाहेर पडत ती त्या रात्री (शुक्रवारी) वाट दिसेल तशी भटकत एका घराजवळ पोहोचली. ७१ वर्षीय लॉरी विकिन्स बाहेर येऊन पाहतात तर एक छोटी मुलगी दारात रडत उभी होती. तिचे कपडे रक्ताने माखले होते आणि अनवाणी होती. अशा अवस्थेतही तिने सर्व धैर्य एकवटून विमान कोसळल्याची माहिती दिली. या दुर्घटनेत माझे आई-वडील मरण पावल्याचे तिने सांगताच लॉरी विकिन्स हेही गहिवरले. तिला घरात घेऊन त्यांनी तिचे कपडे धुतले आणि तिला स्वच्छ केल्यानंतर त्यांनी पोलिसांना या मुलीची व्यथा कळविली, असे त्यांनी एनबीसी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले. केंटकी प्रांत पोलिसांच्या माहितीनुसार या विमान दुर्घटनेत मार्टी गत्झलेर (४९), किम्बेर्ली गत्झलेर (४५), पाईपर गत्झलेर (९) आणि सिएरा वॅल्डर (१४) ठार झाले. पोलिसांनी तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे. तिची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (वृत्तसंस्था)