अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लादला आहे. रशियाकडून तेल घेतल्यास आणखी कर लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आता अमेरिकेच्या मंत्र्यांनी भारताबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. रशियन तेल खरेदी करण्याच्या बाबतीत चीनची परिस्थिती वेगळी आहे. भारत रशियन तेल खरेदी करून मोठा नफा कमवत आहे, असा दावा ट्रम्प यांच्या सरकारमधील अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी मंगळवारी केला.
रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचे भारताने यापूर्वीही म्हटले आहे.
श्रीमंत भारतीयांचा फायदा होतोय
सीएनबीसीशी बोलताना बेझंट म्हणाले की, युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे तेल विकून भारताने मोठा नफा कमावला आहे. भारतीय मनमानी म्हणजे स्वस्त रशियन तेल खरेदी करणे आणि ते युद्धादरम्यानच सुरू झालेले उत्पादन म्हणून पुनर्विक्री करणे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. भारताने रशियाचे तेल खरेदी केल्याने 'श्रीमंत भारतीय कुटुंबांना' फायदा होत आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
"भारत पूर्वी रशियाकडून त्याच्या एकूण गरजेच्या १ टक्क्यांपेक्षा कमी खरेदी करत होता पण आता ते ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भारत फक्त नफा कमवत आहे, ते तेल विकत आहेत. त्यांनी १६ अब्ज डॉलर्स अधिक नफा कमावला आहे. यापैकी काही भारतातील श्रीमंत कुटुंबे आहेत, असंही ते म्हणाले.
चीनबाबतही मोठे विधान
बेझंट यांनी चीनबाबत अमेरिकेच्या धोरणाचेही समर्थन केले. "बीजिंग वेगवेगळ्या ठिकाणाहून तेल आयात करते आणि म्हणूनच त्यांची परिस्थिती वेगळी आहे. विशेष म्हणजे चीन देखील रशियन तेल खरेदी करतो, परंतु अमेरिकेने बीजिंगवर ३० टक्के कर लादला आहे. भारताव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५० टक्के कर लादला आहे.