जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने सौदी अरेबियाला एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे.
संरक्षण क्षेत्रातील हा प्रस्ताव भारत-सौदी अरेबिया संयुक्त संरक्षण सहयोग समितीच्या सातव्या बैठकीत देण्यात आला. ही बैठक २८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पार पडली. भारतीय संरक्षण मंत्रालयानुसार, या बैठकीचे सह-अध्यक्षपद संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदीचे मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी यांनी भूषवले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची खेळीभारत आणि सौदी अरेबियाने संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रशिक्षण, औद्योगिक भागीदारी, सागरी सहकार्य आणि संयुक्त लष्करी कवायतींसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याच चर्चेदरम्यान, भारताने सौदी अरेबियाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान (IT), आपत्ती व्यवस्थापन आणि सामरिक संपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
सध्या सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलांना पाकिस्तानची लष्कर प्रशिक्षण देत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून लष्करी संबंध असून, संयुक्त हवाई, भूदल आणि नौदल कवायती नियमितपणे होतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये पाकिस्तानने सौदी अरेबियाला प्रशिक्षण आणि सल्लागार मिशनसाठी सैनिक पाठवले होते. भारताने सौदीला दिलेल्या या प्रस्तावामुळे पाकिस्तान-सौदीच्या जुन्या लष्करी संबंधांना धक्का बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर आणखी एकाकी पडू शकतो.
मेक इन इंडिया उत्पादनांची ऑफरसंरक्षण सहकार्यासोबतच भारताने 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेली अत्याधुनिक संरक्षण उपकरणेही सौदी अरेबियासमोर सादर केली. चर्चेत दोन्ही देशांनी संरक्षण उपकरणांचे संयुक्त उत्पादन आणि भागीदारी वाढवण्यावरही सहमती दर्शवली.
या वर्षी नौदल आणि भूदलाच्या यशस्वी चर्चेवर दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा चर्चा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. एप्रिल २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान स्थापन झालेल्या 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल' अंतर्गत संरक्षण सहकार्यावरील मंत्रिस्तरीय समितीच्या स्थापनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.