पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे अटारी बोर्डर बंद केली होती. यामुळे अफगाणिस्तानमधून भारतात येणारे ट्रकही बंद होते. दरम्यान, काल अटारी-वाघा सीमेवरून १६० अफगाण ट्रकना विशेष प्रवेशाची परवानगी देऊन भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानप्रती आपली उदारता दाखवली आहे. हे ट्रक सुकामेवा आणि काजू यांसारखे सामान घेऊन भारतात पोहोचले आहेत. भारत आणि तालिबान यांच्यात काही दिवसापूर्वी झालेल्या पहिल्या राजकीय चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारत आणि तालिबानमधील हा पहिला औपचारिक राजकीय संपर्क होता. जयशंकर यांच्या आगामी इराण आणि चीन दौऱ्यापूर्वी मुत्ताकी यांनी त्यांना फोन केला. या संभाषणानंतर दुसऱ्याच दिवशी, भारताने अफगाण ट्रकना अटारी सीमेवरून प्रवेश करण्यास परवानगी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाकिस्तानने वाघा सीमेवर या ट्रकना क्लीयरन्स देण्यास विलंब केला, पण शुक्रवारी अटारी येथे काही ट्रकना अनलोड करण्याची परवानगी देण्यात आली.
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
पहलगाम हल्ल्यानंतर तणाव
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने २४ एप्रिल रोजी अटारी-वाघा सीमा बंद केली. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. भारताने ट्रान्सशिपमेंट सुविधांसह सर्व व्यापार स्थगित केले. आता भारताने अफगाणिस्तानला ही विशेष सूट दिली आहे.
भारत हा दक्षिण आशियातील अफगाणिस्तानचा सर्वात मोठा निर्यात बाजार आहे, दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे १ अब्ज डॉलर आहे. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने सुकामेवा, सफरचंद आणि इतर वस्तू भारतात येतात. अटारी-वाघा सीमा हा भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी सर्वात स्वस्त आणि जलद मार्ग आहे. सीमा बंद होण्यापूर्वी, दररोज ४०-४५ अफगाण ट्रक अटारीला पोहोचत होते.
सीमेवर अजूनही निर्बंध
एप्रिलमध्ये सीमा बंद झाल्यानंतर, पाकिस्तानने २५ एप्रिलपूर्वी पाकिस्तानात प्रवेश केलेल्या १५० अफगाण ट्रकना भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली. यावेळीही अफगाण दूतावासाच्या विनंतीवरून पाकिस्तानने काही ट्रकना मंजुरी दिली. भारत-पाकिस्तान व्यापार आणि लोकांच्या हालचालींवर निर्बंध अजूनही आहेत.