Chinese Nationals visa to india News: गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने चिनी नागरिकांसाठी व्हिसा बंदीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाच वर्षांनी मागे घेण्यात आला असून, २४ जुलै २०२५ पासून चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्यास सुरूवात होणार आहे.
२०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झडप झाली होती. या संघर्षामध्ये भारताचे जवान शहीद झाले होते. चीनचेही काही जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चिनी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पर्यटन व्हिसावर बंदी घातली होती.
चीनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केली घोषणा
चीन नागरिकांना पुन्हा पर्यटन व्हिसा देण्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची घोषणा भारतीय दूतावासाने केली. भारताच्या बीजिंग येथील दूतावासाकडून याची माहिती देण्यात आली.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांनी या निर्णयाबद्दलची घोषणा केली.
भारत-चीनमध्ये असं काय घडलं?
गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले होते. ते हळूहळू पूर्ववत होऊ लागले आहे. दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू असून, परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला दोन्ही देशांनी हवाई वाहतूक सुरू करणे, व्हिसा देणे आणि भारतीय यात्रेकरूंना कैलास मानसरोवर यात्रेसाठी परवानगी देणे यासंदर्भात चर्चा करून मान्यता दिली. दोन्ही देशांनी संबंध पूर्ववत करण्यावर जोर दिला असून, त्याच अनुषंगाने आता भारताने व्हिसा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.