२० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू
By Admin | Updated: April 12, 2016 10:26 IST2016-04-12T10:26:58+5:302016-04-12T10:26:58+5:30
२० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे.

२० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १२ - २० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे. कीरपाल सिंग (५०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली होती. सोमवारी तो सेलमध्ये मृतावस्थेत आढळला. १९९२ साली कीरपालला पाकिस्तानच्या हद्दीत अटक झाली होती.
पंजाब प्रांतातील बॉम्ब स्फोटा प्रकरणी त्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शवविच्छेदनासाठी कीरपालचा मृतदेह लाहोरच्या जिन्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सहकैद्यांकडे कीरपालच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, कीरपालने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली त्यानंतर लगेचच त्याने प्राण सोडला.
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील असलेल्या कीरपालची बॉम्ब स्फोटाच्या आरोपातून लाहोर उच्च न्यायालयाने मुक्तता केली होती. पण अज्ञात कारणामुळे त्याची देहदंडाची शिक्षा कायम ठेवली होती.
आर्थिक दुर्बलतेमुळे आम्ही कीरपालच्या सुटकेसाठी आवाज उठवू शकलो नाही आणि कुठल्याही राजकरण्याने किरपालच्या सुटकेचा विषय लावून धरला नाही असे कीरपालची बहिण जागिर कौरने सांगितले. यापूर्वी कोट लखपत जेलमध्ये एप्रिल २०१३ मध्ये सरबजित सिंग या भारतीय कैद्यावर सहकैद्यांनी अत्यंत क्रूर हल्ला केला होता. त्यामध्ये सरबजितचा मृत्यू झाला होता. सरबजितच्या सुटकेचे प्रकरण भारताने लावून धरले होते.