अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी भारतावर कमी व्यापार केल्याचा आणि जास्त आयात शुल्क लावल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना भारताने ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार थांबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताची 'एफ-३५' विमानांच्या खरेदीत रुची नाहीब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, भारताने अमेरिकेला कळवलं आहे की त्यांना आता 'एफ-३५' स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करण्यात रस नाही. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांनी भारताला ही विमाने विकण्याची ऑफर दिली होती. पण आता भारताने हा करार थांबवला आहे, ज्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
यामागचं मुख्य कारण म्हणजे, मोदी सरकारचं 'मेक इन इंडिया' धोरण. भारताची संरक्षण क्षेत्रातील प्राथमिकता आता स्वदेशी डिझाईन आणि उत्पादनावर केंद्रित आहे. भारत सरकार अशा संरक्षण करारांवर भर देत आहे, ज्यात संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण (technology transfer) शक्य होईल.
तात्काळ सूडाची कारवाई नाही, पण पर्यायी उपायांवर विचारब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या कर लावण्याच्या घोषणेवर भारत तात्काळ कोणताही सूड घेणार नाही. त्याऐवजी, भारत सरकार व्हाइट हाऊसला शांत करण्यासाठी काही पर्यायी उपायांवर विचार करत आहे. यामध्ये पुढील तीन ते चार वर्षांत अमेरिका-भारत यांच्यातील व्यापार असमतोल कमी करण्यासाठी भारताकडून नैसर्गिक वायू, दळणवळण उपकरणं आणि सोन्याची आयात वाढवण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी भारत-रशिया संबंधांबद्दल बोलताना 'त्यांना (भारताला) रशियासोबत जे करायचंय ते करू द्या,' असं म्हटलं होतं. 'भारत नेहमीच रशियाकडून मोठा लष्करी माल खरेदी करतो आणि रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देखील आहे,' असंही ट्रम्प म्हणाले होते.
सध्या तरी भारत सरकार व्यापार चर्चा व्यवस्थित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पण संरक्षण खरेदीचा निर्णय मात्र सध्या बाजूला ठेवण्यात आला आहे, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.