राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला भीक न घातल्याने ट्रम्प यांनी आता अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर नवीन कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत एच-1बी (H-1B) व्हिसावर १ लाख डॉलर्सच्या (सुमारे ८८ लाख रुपये) भरमसाठ शुल्काची घोषणा झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विशेषतः भारतीय आयटी क्षेत्रात यामुळे धांदल माजली आहे. कारण अमेरिकेतील ७० टक्क्यांहून अधिक एच-1बी व्हिसाधारक हे भारतीय व्यावसायिक आहेत. यामुळे भारताकडे जाणाऱ्या एमिरेट्सच्या विमानात गोंधळ उडाला.
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक भारतीय प्रवाशांनी टेकऑफच्या काही काळापूर्वीच एमिरेट्सच्या विमानातून खाली उतरले. यामुळे विमानाच्या उड्डाणाला तीन तासांचा विलंब झाला.
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी चीनने उघडले आपले दार
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
एमिरेट्सच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये लोक अमेरिकेत परत येऊ शकणार नाहीत या भीतीने उतरताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रवासी विमानाच्या मार्गावर उभे असल्याचे दिसत आहे, काही जण आजूबाजूला पाहत आहेत, त्यांना फ्लाइट कधी आणि कशी उड्डाण करेल याची खात्री नाही.
'जर तुम्हाला हवे असेल तर उतरा'
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कॅप्टन प्रवाशांना हवे असेल तर उतरण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. "सध्याच्या परिस्थितीमुळे, जी एमिरेट्समध्ये आमच्यासाठी स्पष्टपणे अभूतपूर्व आहे, आम्हाला माहित आहे की बरेच प्रवासी आमच्यासोबत प्रवास करू इच्छित नसतील आणि ते पूर्णपणे ठीक आहे. आम्ही फक्त अशी विनंती करतो की जर तुम्हाला स्वतःहून उतरायचे असेल तर कृपया तसे करा," असं कॅप्टन सांगत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
"शुक्रवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर एमिरेट्सच्या प्रवाशांमध्ये पूर्णपणे गोंधळ उडाला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नवीन आणि विद्यमान एच 1 बी व्हिसा धारकांना लागू असलेल्या आदेशावर स्वाक्षरी केली, यामुळे अनेक प्रवाशांमध्ये, विशेषतः भारतीय प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आणि त्यांनी विमानातून उतरण्याचा निर्णय घेतला", असे या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे.