भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अमेरिकेतील डल्लास शहरात १० सप्टेंबर रोजी घडली. चंद्रमौली नागमल्लैया असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, आरोपीने पत्नी आणि मुलांसमोरच कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी संशयित आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेज याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चंद्रमौली नागमल्लेया हे ही घटना घडली तेव्हा पत्नी आणि मुलासोबत हॉटेलमध्ये गेलेले होते. त्यावेळी आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेज आणि त्याची महिला सहकारीही तिथे होते. यावेळी नागमल्लैया यांनी मार्टिनेज आणि त्याच्या महिला सहकाऱ्याला खराब वॉशिंग मशीनचा वापर न करण्याचा सल्ला दिला. मात्र ही बाब मार्टिनेज याला सहन झाली नाही.
त्यानंतर आरोपी रागाच्या भरात तणतणत बाहेर आला. त्याने कऱ्हाड काढून नागमल्लैया चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला. नागमल्लैया मदतीसाठी पार्किंग एरियाच्या दिशेने पळाले. मात्र आरोपीने तिथेही त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी नागमल्लैया यांची पत्नी आणि मुलगा तिथेच होते. त्यांनीही मध्ये पडून नागमल्लैया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना धक्का देऊन बाजूला ढकलले आणि नागमल्लैया यांच्यावर कुऱ्हाडीने धाव घातले.
दरम्यान, आरोपीने चंद्रमौली यांच्या डोक्यावर दोन वेळा लाथ मारली. त्यानंतर ते डस्टबिनमध्ये फेकून दिले. दरम्यान, त्याच भागात उपस्थित असलेल्या डल्लास फायर-रेस्क्यू कर्मचाऱ्याने आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.