भारतीय अणुऊर्जेत गुंतवणूक होईल
By Admin | Updated: February 10, 2015 22:53 IST2015-02-10T22:53:20+5:302015-02-10T22:53:20+5:30
अणुउत्तरदायित्व प्रणालीबाबत भारत व अमेरिकेत सहमती झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या कंपन्या भारताच्या अणुप्रकल्पांत भागीदार होतील,

भारतीय अणुऊर्जेत गुंतवणूक होईल
वॉशिंग्टन : अणुउत्तरदायित्व प्रणालीबाबत भारत व अमेरिकेत सहमती झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या कंपन्या भारताच्या अणुप्रकल्पांत भागीदार होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होड्स म्हणाले की, आवश्यक सहमती झाली असून ही प्रक्रिया सुरूच राहील, असे आम्ही मानतो. उत्तरदायित्व प्रणालीसंदर्भातील कोंडी फुटल्याने आमच्या कंपन्यांची चिंता दूर होईल आणि त्या भारतात भागीदारी करण्यास सज्ज होतील. नागरी अणुसहकार्य कराराच्या उत्तरदायित्वाबाबत अमेरिका व भारतात झालेल्या सहमतीबाबत भारत सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी ऱ्होड्स यांना छेडण्यात आले. तेव्हा त्यांनी वरील आशा व्यक्त केली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी उत्तरदायित्व, नुकसानभरपाई व अणुदुर्घटनेच्या नुकसानभरपाई हक्कासह वादग्रस्त मुद्यांवर स्पष्टीकरण देणारे सात पानी निवेदन प्रसिद्धीस दिले होते. भारत-अमेरिका अणुसंपर्क गटात चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर धोरणात्मक अडथळ्यांवर सहमती झाली आहे.
अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर येण्याच्या तीन दिवस आधी या गटाची बैठक झाली होती. ओबामांच्या भारत दौऱ्याचा उल्लेख करताना ऱ्होड्स म्हणाले की, आम्ही दौऱ्यादरम्यान म्हटल्याप्रमाणे कंपन्या स्वत:चा निर्णय स्वत: घेणार आहेत. त्या उत्तरदायित्व निधीच्या मुद्यावर विचार करणार आहेत. ओबामांच्या भारत दौऱ्यादरम्यान ऱ्होड्सही त्यांच्यासोबत आले होते. (वृत्तसंस्था)