ChatGPT डेव्हलप करणारी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी OpenAI चे 26 वर्षीय माजी रिसर्चर सुचीर बालाजी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. सुचीर यांनी नुकतेच ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आणि 14 डिसेंबर रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी बराच वेळ आपल्या घरातून बाहेर आले नव्हते.त्यांनी सहकाऱ्यांच्या फोन कॉलला देखील उत्तर दिले नव्हते. सुचीरचे मित्र आणि सहकारी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुचीर बालाजी यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधिकारी वैद्यकीय पथकासह फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांना सुचीर बालाजी मृत आढळले. प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळून आला नसून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या संचालकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हा आत्महत्या असल्याचे मानले जात आहे.' सुचीर बालाजी यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये OpenAI मधून राजीनामा दिला होता आणि कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी आश्चर्य व्यक्त केले असून इंटरनेटवर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी या बातमीवर 'hmmm' अशी प्रतिक्रिया दिली आणि दुसरे काहीही लिहिले नाही. सुचिर बालाजीने OpenAI वर त्याच्या जनरेटिव्ह AI प्रोग्राम, ChatGPT ला प्रशिक्षित करण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता कॉपीराइट केलेली सामग्री वापरल्याचा जाहीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचे नुकसान होत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, बालाजी यांनी आरोप केला होता की OpenAI च्या पद्धती इंटरनेट इकोसिस्टम आणि व्यवसाय आणि लोकांसाठी हानिकारक आहेत ज्यांचा डेटा कंपनी त्यांच्या संमतीशिवाय वापरत आहे. अनेक लेखक, प्रोग्रामर आणि पत्रकारांनी OpenAI विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सुचीर बालाजी यांचे आरोप केंद्रस्थानी आहेत. या लोकांनी दावा केला आहे की OpenAI ने त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामांचा ChatGPT प्रशिक्षित करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापर केला आहे.