आफ्रिकन देश झांबियामध्ये एका भारतीय तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १९ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि ४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले. आरोपी व्यक्ती हे सर्व सामान त्याच्या सुटकेसमध्ये भरून दुबईला जाण्याच्या तयारीत होता. त्याला झांबिया विमानतळावर पोलिसांनी पकडले.
ही घटना झांबियातील लुसाका येथील केनेथ कौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. दुबईला जाणारी विमानसेवा पकडण्यासाठी एक २७ वर्षीय तरुण विमानतळावर पोहोचला. विमानतळावर तपासणी दरम्यान पोलिसांना त्याच्यावर संशय आला. झांबियाच्या ड्रग एन्फोर्समेंट कमिशनने चौकशीदरम्यान सुटकेसची तपासणी केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
आरोपी व्यक्तीने त्याच्या बॅगेत अनेक नोटांचे गठ्ठे आणि सोन्याच्या विटा लपवल्या होत्या. यावेळी पोलिसांनी २.३२ मिलियन डॉलर्स म्हणजेच १९ कोटी रुपये आणि ५ लाख डॉलर्स म्हणजेच ४ कोटी रुपये किमतीच्या ७ सोन्याच्या विटा जप्त केल्या. त्या व्यक्तीने पैसे रबराने बांधून बॅगेत ठेवले होते. सोन्याच्या विटाही अशाच एका पिशवीत पडलेल्या होत्या.
पोलिसांनी वेगळाच संशय व्यक्त केला
या गुन्ह्यात अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचाही सहभाग असू शकतो, असे डीईसीचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.
झांबियामध्ये सोने आणि तांबे मोठ्या प्रमाणात आढळतात. एवढं सगळं असूनही देशातील ६० टक्के लोकसंख्या गरिबीशी झुंजत आहे. यामुळेच येथे सोन्याची तस्करी अनेकदा दिसून येते. झांबियामधून अशाच प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये, ५ इजिप्शियन नागरिकांना १२७ किलो सोने आणि कोट्यावधी रुपयांसह पकडण्यात आले होते.