भारताने कितीही मदत केली तरी तुर्कस्तान हा पाकिस्तानच्याच बाजुने उभा ठाकला आहे. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रसामुग्री पाठविली आहे. तुर्कीच्या लष्कराचे एअर फोर्स सी १३० हे मालवाहू हर्क्युलिस विमान रविवारी कराची विमानतळावर उतरले आहे.
या विमानामध्ये तुर्कीचा धोकादायक ड्रोन बायरकतार आणि अन्य शस्त्रास्त्रे आहेत. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्की पाकिस्तानला मोठी लष्करी मदत करत आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांना लष्करी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार ही मदत केली जात आहे.
तुर्कीने एक-दोन नव्हे तर सहा मालवाहू विमाने पाकिस्तानला पाठविली आहेत. ही विमाने इस्लामाबाद विमानतळावरही उतरविण्यात आली आहेत. तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला एलओसीवर टक्कर देणार आहे. पाकिस्तानी आणि तुर्कीच्या सुत्रांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतू, त्यात काय काय आहे हे मात्र त्यांना सांगितलेले नाही.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि काश्मीरवरून भारत-पाकिस्तान संघर्षानंतर, तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला आहे. वेळोवेळी तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. तरीही भारत नेहमी तुर्कीची मदत करत आला आहे. तुर्की, पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या संरक्षण संबंधांवर यामुळे प्रकाश टाकला गेला आहे. पाकिस्तान या दोन देशांच्या जिवावरच भारतासोबत युद्धाची खुमखुमी बाळगून आहे.
पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) पेन्सी, स्कार्दू आणि स्वात या प्रमुख हवाई तळांना सक्रिय केले आहे. यावर अमेरिकेने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दिलेली एफ-१६, जे-१० आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.