पहलगाम हल्ल्याला आता जवळपास १० दिवस उलटून गेले आहेत. अद्याप भारताने पाकिस्तानवर किंवा तेथील दहशतवाद्यांवर कारवाई केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असा दावा पाकिस्तानने मध्यरात्री केला होता. भारत युद्ध पुकारणार असे जरी सांगितले जात आहे, अशातच शेजारच्या बांगलादेशने केलेले उपकार विसरून भारताविरोधात बोलायला सुरुवात केली आहे.
जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतविरोधी वक्तव्य केले आहे. जर नवी दिल्ली पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करत असेल तर ढाक्याने चीनच्या मदतीने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा, असे एएलएम फजलुर रहमान याने म्हटले आहे. रहमान हा माजी सैन्य अधिकारी देखील आहे. सध्या रहमान हा २००९ च्या बांगलादेश रायफल्स हत्याकांडाच्या चौकशी समितीचा अध्यक्ष आहे.
काही काळापूर्वी मोहम्मद युनूस यांनीही भारतातील सात ईशान्येकडील राज्यांबद्दल भाष्य केले होते. युनूस यांनी ईशान्य भारताचे वर्णन भूपरिवेष्ठित प्रदेश म्हणून केले होते आणि बांगलादेशला संपूर्ण प्रदेशासाठी समुद्राचा एकमेव संरक्षक म्हटले होते. तेव्हा ते बीजिंगच्या भेटीवर होते.
यानंतर बांगलादेशच्या रहमान या अधिकाऱ्याची पोस्ट आली आहे. आधीच बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेलेले आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये रहमान म्हणाला की, 'जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्येकडील सात राज्ये ताब्यात घ्यावीत. या संदर्भात, मला वाटते की चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.'