JD Vance News: २६ पर्यटकांनी प्राण गमावलेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील सीमेवर तणाव असून, युद्धाच्या चर्चांनाही तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भाष्य करताना भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. पण, युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील आणि सीमेवरील सुरक्षा प्रचंड वाढवण्यात आली आहे. सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत असून, युद्धाच्या चर्चांचेही पेव फुटले आहेत.
'युद्ध भडकू देऊ नका'
फॉक्स न्यूजला जेडी व्हान्स यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, भारत या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर अशा पद्धतीने देईल की, त्यातून प्रादेशिक युद्ध भडकणार नाही. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान, जर यात कुठल्या बाबतीत जबाबदार आहे, तर ते म्हणजे त्याने भारताला दहशतवाद्यांना पकडून देण्यात आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सहकार्य करण्यासाठी आहे.'
तणाव वाढल्यानंतर व्हान्स यांचं विधान
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचे हे विधान अशा काळात आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात असून, भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रुबियो यांनी शरीफ यांच्याशी बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करावे आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले टाकावीत असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.