पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर केलेल्या या प्रहार पाकिस्तानला झोंबला आणि पाक लष्कराने भारतावरच हल्ल्याचे प्रयत्न केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले, पण भारताने त्यांचे पाच फायटर पाडले. भारताच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी याची माहिती दिली. या माहितीने पाकिस्तानचा आणखीच थयथयाट झाला असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी असं काही झालेच नाही, असं म्हटलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी केलेल्या विधानानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी फायटर जेट पाडल्याचा दावा फेटाळला. आसिफ म्हणाले, 'पाकिस्तानचे एकही फायटर विमान भारतीय हल्ल्यात पाडले गेले नाही. त्याचबरोबर एकही विमान नष्ट केले गेले. तीन महिन्याच्या कालावधीत भारताकडून असे दावे केले गेले नाही. आम्ही तातडीने आंतरराष्ट्रीय माध्यमांना याची माहिती दिली आहे.'
'भारताने केलेले दावे अविश्वसनीय आणि चुकीच्या वेळी केले गेले आहेत. एलओसीवर भारताचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जर जगाला सत्य सांगायचे असेल, तर दोन्ही देशांनी आपापल्या विमानांची स्वतंत्र खुली चौकशी करावी. त्यातून सत्य समोर येईल', असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी म्हटले आहे.
भारताचे एअर चीफ मार्शल काय म्हणाले? "ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले. हे मोठे विमान ईएलआयएनटी किंवा एईडब्ल्यूएडीसीचे असू शकते. जमिनीवरून हवेत ३०० किमी अंतरावर लक्ष्य करण्यात आले होते. हा जमिनीवर हवेत करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे', असे भारताचे एअर चीफ मार्शल म्हणाले होते.