पाकमधील पूरासाठी भारतच जबाबदार - हाफीज सईद
By Admin | Updated: September 9, 2014 14:44 IST2014-09-09T12:25:11+5:302014-09-09T14:44:54+5:30
पाकमधील पूरासाठी भारताला जबाबदार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.

पाकमधील पूरासाठी भारतच जबाबदार - हाफीज सईद
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ९ - मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि 'जमात- उद- दावा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने पाकमधील पूरासाठी भारताला जबाबादार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप केला आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या एका मदतकेंद्राला भेट दिल्यानंतर सईदने हा आरोप करत भारताला दोषी ठरवले. ' एकीकडे भारताने पूर्वसूचना न देताच धरणांचे पाणी पाकिस्तानातील नद्यांमध्ये सोडले, जनतेला चुकीची माहिती दिली, ज्यामुळे अनेक निरपराधांचे प्राण गेले. आणि आता दुसरीकडे भारत पूरग्रस्तांना मदत करत आहे. हा खोडसाळपणाच आहे, असे त्याने म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी देऊ केलेली मदत म्हणजे काश्मिरी व पाकिस्तानी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही सईद याने म्हटले आहे. पाकिस्तानात मुसळधार पावसाने शेकडो नागरिकांचे प्राण घेतले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला असून अनेक नागरिक बेघर झाले आहेत. २०१० मध्ये पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भयंकर पाऊस होऊन त्यात १,७०० लोक ठार झाले होते.