नवी दिल्ली- जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट पसरली. हल्ल्यातील कुठल्याही दहशतवादाला सोडणार नाही अशी प्रतिज्ञाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर १५ दिवसांनी ७ मे रोजी भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यातच ५ मोठ्या दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला असल्याचे दिसून येते. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकचे ५ मोठे दहशतवादी ठार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत हे ५ टॉप दहशतवादी?
१) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल - हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी असून त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत झाली, त्याचे नेतृत्व जागतिक दहशतवादी असलेला जमात-ए-उद-दावाचा हाफिज अब्दुल रौफ याने केले. पाक लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी त्याच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते.
२) हाफिज मुहम्मद जमील - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा होता.
३) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब - हा देखील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहरचा दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात फरार होता.
४) खालिद उर्फ अबू आकाशा - हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले आणि त्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.
५) मोहम्मद हसन खान - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताचा हल्ला, दहशतवादी बिळातून बाहेर पडले
लश्कर ए तोयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला घडवला होता. संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. भारताविरोधात अनेक दहशतवादी कट रचण्याचं काम या संघटनेने केले आहे. परंतु यावेळी भारतीय सैन्याने त्याचे मुख्यालयच उडवून टाकले. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा झाला.