India Pakistan Latest News: भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या प्रहाराने विव्हळत असलेल्या पाकिस्तानने गुरूवारी (८ मे) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान निष्फळ हवाई हल्ले केले. भारतातील जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेर या ठिकाणांसह काही शहरांवर ड्रोन हल्ले केले. भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे हल्ले हवेतच निष्क्रिय केले. दरम्यान, पाकिस्तानातील लाहोर, सियालकोट-कराची आणि इस्लामाबादमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निवासस्थानापासून २० किमी अंतरावर स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत आणि पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली आहे. पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष वाढला आहे. पाकिस्तान जिथे जिथे हल्ले करण्याचे प्रयत्न केले, ते भारतीय लष्कराने हवेतच उडवले.
पाकिस्तानमध्ये स्फोट
पाकने हवाई हल्ले केल्यानंतर भारतीय लष्कराने जबरदस्त उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. भारतीय लष्कर आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाल्यानंतर पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या शहरात मोठे स्फोट झाले आहे. पेशावरमध्ये चार स्फोट झाले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानापासून २० किमी अंतरावर मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. लाहोरमध्येही स्फोट झाले असून, सियालकोट, कराची आणि इस्लामाबादमध्येही स्फोट झाले आहेत.
नौशेरात दोन ड्रोन पाडले
पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील नौशेरामध्ये दोन ड्रोन हल्ले केले. पण, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हे दोन्ही ड्रोन हवेतच टिपले. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने तब्बल ३५ मिनिटं ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या या ड्रोन हल्ल्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. हा हल्ला ८.४५ ते ९.१५-२० वाजेच्या दरम्यान करण्यात आला.