नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची तयारी पाहून पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे जगासमोर पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. अन्य देशांकडे मदतीची याचना करत आहे. त्यात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या मुद्द्यावर बैठक बोलवण्याची विनंती केली. त्याशिवाय बंद दाराआड ही बैठक व्हावी अशी मागणी पाकिस्ताननं केली. मात्र या बैठकीत पाकिस्तानचा फज्जा उडाला आहे.
बैठकीनंतर पाकची पोलखोल उघड
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद खोलीतील बैठकीनंतर पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार अहमद यांनी खोटे सांगत या बैठकीत आम्हाला जे हवे ते मिळाले असा दावा केला. त्याशिवाय बैठकीत जम्मू काश्मीर मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली असं म्हटलं. परंतु आता हळूहळू बैठकीतील मुद्दे समोर येऊ लागल्याने पाकिस्तानची पोलखोल उघड झाली आहे. या बैठकीत पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला रोखठोक सवाल विचारण्यात आले. पहलगाम हल्ल्यात लश्कर ए तोयबाच्या भूमिकेवरून पाकिस्तानला फटकारले. UNSC च्या सदस्य देशांनी पाकिस्तानकडून भारताविरोधात होणाऱ्या खोट्या आरोपांना फेटाळण्यात आले. या बैठकीत पाकिस्तान स्वत:ला पीडित म्हणून दाखवत भारतावर निशाणा साधत होता, हा डाव त्याच्यावरच उलटला.
चीनचीही साथ मिळाली नाही
सर्वात हैराण म्हणजे UNSC च्या कायमस्वरुपी सदस्यांपैकी अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन यांनी पाकिस्तानला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. या बैठकीत ज्याच्या जीवावर पाकिस्तान उड्या मारतो, त्या चीननेही त्याला साथ दिली नाही. पाकिस्तान UNSC चा तात्पुरता सदस्य आहे. त्यामुळे त्याने ही बैठक आयोजित करण्याचा आग्रह धरला होता. सूत्रांनुसार, बैठकीत सदस्य देशांनी न केवळ पहलगाम हल्ल्याचा कठोर निषेध केला तर धर्म विचारून पर्यटकांना टार्गेट केल्याचा मुद्दाही उचलून धरला. काही देशांनी पाकिस्तानकडून मिसाईल टेस्ट आणि अणुहल्ल्याची धमकी देण्यावरूनही प्रश्न उभे केले. त्यामुळे या बैठकीतून पाकिस्तानला काहीच निष्पन्न झाले नाही, उलट त्याची फजिती मात्र झाली.