कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानात दहशत पसरली आहे. भारतपाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकते असा दावा तिथले मंत्री, नेते करत आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानी राष्ट्रपती यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सोमवारी ५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता इस्लामाबाद येथे संसद भवनात विशेष अधिवेशन होणार आहे. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी त्याचं नोटिफिकेशन जारी केले आहे.
पाकिस्तानी राष्ट्रपतींनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटलंय की, इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानच्या संविधानानुसार कलम ५४ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी संसद भवन, इस्लामाबाद इथं ५ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष बैठक बोलावली आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे. पीटीआय पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की नाही हे अधिवेशनात कळेल. इमरान खान यांनी जेलमधून निवेदन जारी करत भारताविरोधात ते सरकारला समर्थन देतील असं सांगितले आहे.
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
पाकिस्तानात कधी बोलावली जाते संसदेची विशेष बैठक?
पाकिस्तानात आपत्कालीन बैठक अशावेळी बोलावली जाते जेव्हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असेल. राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या या विशेष बैठकीला सर्वपक्षीय नेते, सुरक्षा तज्त्र आणि मंत्रिमंडळ उपस्थित असते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विशेषत: सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानी संसदेत भारतासोबतच्या तणावावर चर्चा केली जाईल. त्याशिवाय सैन्य आणि राजनैतिक नीतीवर विचारविनिमय होईल.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानशी सर्व चर्चा बंद केली आहे. भारताने सिंधु जल कराराला स्थगिती देऊन मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना भारतातून परत पाठवले जात आहे. त्यातच पाकिस्तानी नेते सातत्याने भारताला पोकळ धमकी देत आहेत. बिलावल भुट्टोने तर सिंधु नदीच्या पाण्याऐवजी रक्त वाहण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर सातत्याने बैठका घेत आहेत. सीमा भागात सायरन वाजवला जात आहे. सातत्याने मिसाईल चाचणी केली जात आहे.