भारत आमची प्रतिमा मलिन करतोय, पाकिस्तानचा कांगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 19:14 IST2016-09-25T19:06:21+5:302016-09-25T19:14:24+5:30
पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे, असा अपप्रचार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे.

भारत आमची प्रतिमा मलिन करतोय, पाकिस्तानचा कांगावा
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 25 - पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे, असा अपप्रचार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच नरेंद्र मोदींचा हा खटाटोप सुरू असल्याचं सांगून पाकिस्तानने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधल्या कोझिकोड येथे घेतलेल्या जाहीर सभेत पाकिस्तानवर थेट टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.
नरेंद्र मोदी पाकिस्तानची प्रतिमा मलिन करू पाहत आहेत. त्यामुळेच जाणूनबुजून भडकावणारी वक्तव्ये करून भारताचे नेते पाकिस्तानची जागतिक पातळीवर प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप पाकिस्ताननं पत्रकाद्वारे केला आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप निराधार आहे. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अशा प्रकारे राजकीय विधाने करणे चुकीचे असल्याचं त्या पत्रकात म्हटले आहे.
काश्मीरमध्ये भारतीय लष्कर करत असलेल्या अत्याचारांपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारत असे उद्याग करत असल्याचं पाकिस्तान म्हणाला आहे. दहशतवादी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरमधील तरुण नेता असा केला. बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दडपशाही सुरू झाली आहे, असा दावाही पाकिस्तानने केला.