Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ब्रिक्स देशांवर कर लादण्याची घोषणा केली. लवकरच ब्रिक्स देशांवर १० टक्के कर लादला जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. व्हाईट हाऊस येथे त्यांच्या कॅबिनेट अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी, "लवकरच ब्रिक्सचा भाग असलेल्या सर्व देशांवर १० टक्के कर लादला जाईल, असं म्हटलं.
"जर ते ब्रिक्समध्ये असतील तर त्यांना निश्चितच १० टक्के अतिरिक्त कर भरावे लागतील कारण ब्रिक्सची स्थापना आपल्याला दुखावण्यासाठी, आपल्या डॉलरची अधोगती करण्यासाठी करण्यात आली होती. डॉलर सर्वात श्रेष्ठ आहे. आपण ते असेच ठेवूया. जर लोकांना आव्हान द्यायचे असेल तर ते करू शकतात. पण त्यांना त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. मला वाटत नाही की त्यापैकी कोणालाही ही किंमत मोजावीशी वाटेल," असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या विधानावरून हे स्पष्ट झालंयी की अमेरिका ब्रिक्स गटातील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्ध कठोर व्यापारी भूमिका स्विकारणार आहे. ब्रिक्स समूह जागतिक व्यापार आणि राजनैतिकतेमध्ये आपली पकड मजबूत करत असताना आणि अनेक नवीन देशांनीही त्यात सामील होण्यास रस दाखवलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह ब्रिक्स देशांसाठी अमेरिकन बाजारपेठांमध्ये प्रवेश महाग होऊ शकतो, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
मंगळवारी ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. अमेरिका तांब्याच्या आयातीवर ५० टक्के कर लादणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत ट्रम्प यांनी, "आज आम्ही तांब्यावर कारवाई करत आहोत," असं म्हटलं. यासोबतच ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीबाबत मोठे विधान केले. अमेरिका लवकरच औषधांवर मोठी घोषणा करेल आणि किमान एक वर्षानंतर त्यांच्यावर २०० टक्क्यांपर्यंतचे शुल्क लादले जाऊ शकते, असेही ट्रम्प म्हणाले.