Trump UN Speech: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८० व्या सत्रात पहिल्यांदाच जागतिक नेत्यांना संबोधित केले. त्यांचे भाषण प्रामुख्याने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर केंद्रित होते. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने जागतिक स्तरावर आपले मजबूत स्थान पुन्हा मिळवल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी चीन आणि भारतासह अनेक नाटो देशांवरही निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना भारत आणि चीनवर युक्रेन युद्धाला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी भारत आणि चीन रशियाला निधी देत असल्याचा आरोप केला. ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे, ज्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकन कर ५० टक्क्यांवर पोहोचला, जो जगातील सर्वाधिक आहे. "चीन आणि भारत हे रशियन तेल खरेदी करून या युद्धाला निधी देणारे मुख्य देश आहेत," असे ट्रम्प यांनी सांगितले. दुसरीकडे भारताने अमेरिकेच्या कर अन्याय्य असल्याचे म्हटले. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, ते आपल्या राष्ट्रीय आणि आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल, असं भारताकडून सांगण्यात आलं.
"चीन आणि भारत हे रशियन तेल खरेदी करून या युद्धाचे मुख्य वित्तपुरवठादार आहेत. नाटो देशांनीही रशियन ऊर्जा आणि रशियन ऊर्जा उत्पादनांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत, जे तुम्हाला माहिती आहेच. मला दोन आठवड्यांपूर्वी कळले आणि मी त्याबद्दल खूश नव्हतो. जर रशिया तडजोड करण्यास तयार नसेल, तर युद्ध संपवण्यासाठी अमेरिका कठोर शुल्क लादण्यास पूर्णपणे तयार आहे, ज्यामुळे रक्तपात थांबेल. मला वाटते की ते लवकरच होईल. पण हे शुल्क प्रभावी होण्यासाठी, युरोपीय देशांना आत्ता येथे असलेल्या तुम्ही सर्वांनी, हे उपाय स्वीकारण्यात आमच्यासोबत सामील व्हावे लागेल," असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. २०२० मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून शेवटचे भाषण केले. इराण युद्धाचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले, "तिथे, आम्ही ऑपरेशन मिडनाईट हॅमरद्वारे इराणी अण्वस्त्र सुविधा नष्ट केल्या. माझा विश्वास आहे की कोणत्याही धोकादायक देशाकडे अण्वस्त्रे नसावीत. मी असेही म्हणतो की आम्ही जे केले ते दुसरे कोणीही करू शकले नसते."