India-America Relation:भारत आणि अमेरिकेतील ताणलेले संबंध पुर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा भारतावर रशियन तेल खरेदीवरुन निशाणा साधला. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असा इशारा लुटनिक यांनी दिला. त्यामुळे आता हे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
रशियाकडून तेली खरेदी केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५+२५, असा एकूण ५० टक्के कर लादला आहे. तसेच, त्यांनी भारतावर अनेकदा टोकाची टीकाही केली आहे. मात्र, अलिकडेच त्यांनी पंतप्रधान मोदींना आपला खास मित्र म्हणत, ताणलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पीएम मोदींनीही अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यावर सकारात्मकता दाखवली. मात्र, आता ट्रम्प यांचेच मंत्री भारताला धमकावत आहेत.
हॉवर्ड लुटनिक रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर सतत टीका करत आहेत. त्यांनी म्हटले की, 'आम्ही सध्या भारतासोबतच्या व्यापार करारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, त्यानंतरच अतिरिक्त शुल्क आणि व्यापार करारावर चर्चा होईल.'
गेल्या आठवड्यात ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, '५० टक्के शुल्काचा सामना करणारा भारत लवकरच अमेरिकेच्या दबावाला बळी पडेल. मला वाटते की, एक-दोन महिन्यांत भारत वाटाघाटी करण्यास तयार होईल. ते माफी मागतील आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न करतील.' एकीकडे ट्रम्प यांचा संबंध सुधारण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे मंत्र्यांची अशी विधाने. यामुळे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.