India-America-China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य व्यापार सल्लागार पीटर नवारो सध्या चर्चेत आहेत. आधी त्यांनी रशियन तेलावरुन भारतावर जातिवाचक टीका केली. त्यानंतर आता भारत, रशिया आणि चीनची एकता 'त्रासदायक' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, 'नरेंद्र मोदी यांनी रशियाऐवजीअमेरिका, युरोप आणि युक्रेनसोबत असले पाहिजे.
'हे खूप त्रासदायक'चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत पीएम मोदी, व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग एकत्र आले होते. या तिघांच्या भेटीची जगभरात चर्चा सुरू आहे. आता या भेटीवर नवारो यांनी गरळ ओकली आहे. नवारो म्हणाले, "हे खूप त्रासदायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रमुख मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग सारख्या दोन मोठ्या हुकूमशहा नेत्यांशी जवळीक साधणे लज्जास्पद आहे."
'मोदी काय विचार करताहेत, हे मला समजत नाही'नवारो पुढे म्हणाले, ''मोदी काय विचार करत आहेत, हे मला समजत नाही. भारत आणि चीनमध्ये दशकांपासून तणाव आहे. कधीकधी हा तणाव युद्धापर्यंत पोहोचला आहे. आम्हाला आशा आहे की, भारतीय नेते हे समजून घेतील की, त्यांनी रशियाऐवजी अमेरिका, युरोप आणि युक्रेनसोबत असले पाहिजे. त्यांना रशियन तेल खरेदी करणे थांबवावेच लागेल.''
नवारोंचे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या २ दशकांतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५% परस्पर शुल्क आणि रशियन तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५% शुल्क लादले, ज्यामुळे भारतावरील एकूण शुल्क ५०% पर्यंत पोहोचला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा सर्वाधिक आहे. भारताने या शुल्कांना अयोग्य आणि अतार्किक म्हटले आहे.