भारत दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय - पाकिस्तानचा कांगावा
By Admin | Updated: May 24, 2015 13:49 IST2015-05-24T13:49:13+5:302015-05-24T13:49:13+5:30
मनोहर पर्रीकर यांच्या विधानाने पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळते असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

भारत दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय - पाकिस्तानचा कांगावा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - मनोहर पर्रीकर यांच्या विधानाने पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळते असा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील पर्रीकर यांच्या विधानाने आता पाक दहशतवादी हल्ल्यांचे खापर भारतावरच फोडेल असे सांगत पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणा-या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरुन पाकिस्तानने भारतावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा व परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. भारतातील सरकारचा मंत्री पहिल्यांदाच अशा भाषेचा वापर करत दहशतवादाने दहशतवाद संपवण्याचे उघडपणे समर्थन करतो. यावरुन पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असल्याच्या शंकांना पाठबळ मिळते असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान भारतासोबत चांगला शेजारी राष्ट्र होण्याचा प्रयत्न करत असून दहशतवाद हा दोन्ही देशांचा शत्रू आहे असेही त्यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी गटांनी पर्रीकर यांच्या विधानाचा प्रखर विरोध दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे. 'यापुढे पाकिस्तानमधील प्रत्येक हल्ल्याचे खापर भारतावर फोडले जाईल' असे त्यांनी म्हटले आहे.