अमेरिकेत पोलिसांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार
By Admin | Updated: December 30, 2014 23:50 IST2014-12-30T23:50:47+5:302014-12-30T23:50:47+5:30
लॉस एंजल्सच्या अशांत भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या कारवर दोन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कारमधील दोन्ही पोलिसांना इजा झाली नाही, तसेच एकाने प्रत्युत्तरही दिले.

अमेरिकेत पोलिसांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार
लॉस एंजल्स : लॉस एंजल्सच्या अशांत भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या कारवर दोन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कारमधील दोन्ही पोलिसांना इजा झाली नाही, तसेच एकाने प्रत्युत्तरही दिले.
संशयित हल्लेखोरापैकी एकाला गजाआड करण्यात आले असून दुसरा अद्यापही फरार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलास मारल्याप्रकरणी ग्रॅण्ड ज्युरींनी गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यास नकार दिल्यापासून देशभरात पोलिसांवरील हल्ले वाढले असतानाच लॉस एंजल्समधील घटना घडली. तथापि, पोलिसांनी या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे. देशात इतरत्र होत असलेल्या हल्ल्यांशी या घटनेचा संबंध असल्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही चिथावणीविना हा हल्ला करण्यात आला होता, असे लॉस एंजल्स पोलीस दलाचे उपप्रमुख बॉब ग्रीन यांनी सांगितले. पोलीस गस्त घालत होते, तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका संशयितास अटक केली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
संशयित आणि हल्ला झालेल्या पोलिसांची ओळख उघड करण्यात आली नाही.