कंगाल झालेला पाकिस्तान पैसे मिळविण्यासाठी काय काय करेल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. कर्जासाठी, आर्थिक मदतीसाठी सगळ्या जगात त्यांचं कटोरा घेऊन फिरून झालंच आहे, पण त्यासाठी आपल्याच देशातल्या गोरगरीब नागरिकांनाही त्यांनी सोडलेलं नाही. त्यांच्याकडूनही जितका पैसा वसूल करता येईल, जितका टॅक्स त्यांच्यावर लावता येईल, तेवढा त्यांनी लावला आहे.
पाकिस्तानात जे नागरिक, गोरगरीब, सर्वसामान्य माणसं, शेतकरी गाय-म्हैस पाळतात, त्यांच्यावरही ‘गोबर टॅक्स’ लावायची तयारी त्यांनी आता सुरू केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डेली टाइम्सच्या अहवालानुसार पाकिस्तानच्या पंजाब राज्यात मरियम नवाज यांचं सरकार प्रत्येक गाय आणि म्हशीच्या मालकाकडून दररोज ३० पाकिस्तानी रुपये ‘फी’ लागू करणार आहे.
ग्रीन एनर्जीच्या नावाखाली सरकारनं हा निर्णय घेतला आहे. ही योजना ‘सुथरा पंजाब’ बायोगॅस कार्यक्रमाचा भाग आहे. हा कार्यक्रम डिसेंबर २०२४ मध्ये पंजाब राज्यात सुरू झाला होता. याचा उद्देश कचरा स्वच्छ करणं आणि त्यापासून बायोगॅस तयार करून ऊर्जा निर्माण करणं हा आहे.दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर तीव्र टीका केली असून त्याला ‘गोबर टॅक्स’ असं नाव दिलं आहे. त्यांच्या मते ‘ग्रीन एनर्जी’ हा फक्त दिखावा आहे, खरी गोष्ट काही वेगळीच आहे. सरकारचा हा निर्णय आधीच महागाई आणि महाग चाऱ्यानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसा काढण्याचा मार्ग आहे.
सरकारनं ही फी लागू करण्यासाठी राज्यातील सुमारे १६८ ‘कॅटल कॉलनीं’ची निवड केली आहे. त्यात जवळपास ५० लाख गायी-म्हशी आहेत. पहिल्या टप्प्यात लाहोरमधील हरबंसपुरा आणि गुज्जरपुरा या दोन प्रमुख कॉलनींपासून सुरुवात होईल. नंतर संपूर्ण पंजाबमध्ये ही योजना विस्तारली जाईल. सरकारचं म्हणणं आहे की या पैशांचा वापर शेण जमा करणं, कचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस प्लॅण्ट चालवण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे पर्यावरणालाही फायदा होईल.
इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या गायी-म्हशींपासून रोज किती शेण मिळतं हे अचूक मोजणं अशक्य आहे. त्यामुळे सरकारनं प्रतिजनावर ठराविक फी वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे, पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या राज्याकडे आता उत्पन्नाचे योग्य मार्गच उरलेले नाहीत. दरम्यान, शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वेगळीच आहे. आधीच महाग चारा, वाढते वीजदर आणि महागाईमुळे ते त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत हा नवा कर त्यांच्या खर्चात आणि चिंतेत आणखी वाढ करणार आहे.
एका पाकिस्तानी उद्योगतज्ज्ञानं सांगितलं, एकीकडे भ्रष्ट नेते, अधिकारी लक्झरी गाड्या, परदेश दौरे आणि मोठ्या पगारात ऐश करीत आहेत, दुसरीकडे जो शेतकरी आधीच स्वत:चं आणि आपल्या जनावरांचं पोट भरण्यासाठी झगडतो आहे, त्याला आता गायी-म्हशींच्या शेणासाठीही सरकारला पैसे द्यावे लागणार आहेत. यावरून स्पष्ट होतं की व्यवस्था किती बिघडली आहे!’ दिवसाला तीस रुपये याप्रमाणे गरीब शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे ११ हजार रुपये ‘गोबर टॅक्स’ द्यावा लागणार असल्यानं त्यांचं कंबरडं मोडणार आहे.
Web Summary : Cash-strapped Pakistan introduces 'dung tax' on livestock owners in Punjab. Each cow and buffalo owner will pay a daily fee. Critics slam it as burdening farmers already struggling with inflation and high feed costs, benefiting corrupt officials.
Web Summary : कंगाल पाकिस्तान ने पंजाब में पशुपालकों पर 'गोबर कर' लगाया। प्रत्येक गाय और भैंस मालिक को प्रतिदिन शुल्क देना होगा। आलोचकों ने इसे पहले से ही मुद्रास्फीति और उच्च चारा लागत से जूझ रहे किसानों पर बोझ बताया है, जिससे भ्रष्ट अधिकारियों को लाभ होगा।