अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेकांच्या उरात धडकी भरवली आहे. कोणाला काही वाटो, आपल्या निर्णयांचे कितीही दूरगामी परिणाम होवोत, त्याची काहीही फिकीर न करता त्यांनी ‘चांगल्या-वाइट’ निर्णयांचा धडाका सुरूच ठेवला आहे.
त्यांच्या निर्णयाचा जगभरातील प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला आहे. अर्थातच ज्यांनी अमेरिकेत अवैध मार्गानं प्रवेश मिळवला आहे, असे हे प्रवासी आहेत. अशा अनेक देशाच्या हजारो प्रवाशांना त्यांनी आधीच आपापल्या देशात पाठवलं आहे. अजूनही अमेरिकेत विविध देशातील असे लाखो लोक आहेत जे अवैध मार्गानं किंवा काही ‘गडबड’ करून अमेरिकेत आलेले आहेत. ट्रम्प यांच्या दृष्टीनं ते गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांना अक्षरश: बेड्या आणि साखळदंड घालून त्यांच्या-त्यांच्या देशात पाठवणी केली जात आहे. ज्या पद्धतीनं या नागरिकांना वागवलं जातं आहे .
आता तर अमेरिकेतील अशा अवैध लोकांची अक्षरश: डोळ्यात तेल घालून चौकशी आणि तपासणी सुरू आहे. ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाला तसे आदेशच दिले आहेत. त्यामुळे दिसेल तिथून अशा प्रवाशांची धरपकड सुरू आहे. त्यांना पकडून डिटेन्शन सेंटरमध्ये टाकलं जात आहे. आता परिस्थिती अशी आहे, की अमेरिकेतली जवळपास सर्वच डिटेन्शन सेंटर्स फुल झाली आहेत. त्यामुळे त्यांना आता थेट तुरुंगात टाकण्यात येत आहे. तुरुंगातही आता त्यांच्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. तिथेही क्षमतेपेक्षा जास्त लोक झाले आहेत. त्यांना कैद्यांसोबत ठेवलं जात असल्यामुळे आणि कैद्यांसारखी वागणूक दिली जात असल्यामुळे जागतिक पातळीवर याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. लॉस एंजलिस, मियामी, अटलांटा अणि कॅन्साससहित अन्य नऊ तुरुंगात या अवैध प्रवाशांना ठेवण्यात आलं आहे. या तुरुंगांमध्ये गंभीर गुन्ह्याचे अनेक कैदी आहेत.
इमिग्रेशन ॲण्ड कस्टम एन्फोर्समेंट (आयसीइ)च्या डिटेंन्शन सेंटरमध्ये ४१ हजार जणांना ठेवण्याची क्षमता आहे, पण प्रत्येक डिटेन्शन सेंटरमध्येही क्षमतेपेक्षा जास्त ‘प्रवाशांना’ कोंबण्यात आलं आहे. हीच स्थिती तुरुंगांची आहे. अनेक भारतीयांनाही या डिटेन्शन सेंटरमध्ये डांबण्यात आलं आहे. भारतानंही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या तर परिस्थिती अशी आहे की, अमेरिकेत रोज किमान १२०० अवैध प्रवाशांची धरपकड केली जात आहे. अमेरिकन सरकारच्या मते अमेरिकेत जवळपास एक कोटी दहा लाखापेक्षा अधिक अवैध प्रवासी आहेत. त्या सगळ्यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची योजना ट्रम्प यांच्या सरकारनं आखली आहे. आता अवैध प्रवाशांना पकडण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांनाही दिले आहेत. त्यासाठी राज्याराज्यांतील पोलिसांना ट्रेनिंगही दिलं जात आहे. या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून, त्यांना अमानवी वागणूक दिली जात असल्याचा आरोप या प्रवाशांनी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही केला आहे. त्यांना वेळेवर जेवण दिलं जात नाही. जे जेवण मिळतं, ते शिळं आणि त्याचा वास येत असतो. कडाक्याच्या थंडीत त्यांना गारठलेल्या थंडगार फरशीवर झोपवलं जातं. दिवसभरातून त्यांना केवळ अर्धाच तास तुरुंगाच्या बाहेर पाठवलं जातं.