व्हॉटस्अॅपच्या मेसेजकडे दुर्लक्ष; पत्नीला घटस्फोट
By Admin | Updated: November 18, 2014 00:32 IST2014-11-18T00:32:00+5:302014-11-18T00:32:00+5:30
व्हॉटस्अॅपवर पाठविलेला मेसेज न वाचता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सौदी माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे

व्हॉटस्अॅपच्या मेसेजकडे दुर्लक्ष; पत्नीला घटस्फोट
दुबई : व्हॉटस्अॅपवर पाठविलेला मेसेज न वाचता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सौदी माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. हा पती ३० वर्षांचा असून, त्याची पत्नी मित्रमंडळी व कुटुंबीय यांच्याशी चॅटिंग करण्यासाठी फोनचा वापर करते असा त्याचा आरोप आहे. पत्नी दिवसातला बराचसा वेळ फक्त चॅटिंग करत असते, एवढेच नाही, त्यापायी तिचे मुलांकडे तसेच घराकडेही लक्ष नसते असे त्याचे म्हणणे आहे. पतीचा मेसेज का वाचला नाहीस, असे पत्नीला विचारले असता, तिने मैत्रिणीशी बोलत असल्याचे सांगितले.
पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीची ही सवय बदलण्याचे त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. मी तिला मुद्दाम स्मार्टफोन घेऊन दिला. या फोनवर व्हॉटस्अॅपचा मेसेज आला तर आवाज होतो. असे असूनही पत्नी माझे मेसेज वाचत नाही, वाचले तरीही त्याला उत्तर देत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे अखेर घटस्फोट द्यावा लागला. अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोशल साईटमुळे होणाऱ्या घटस्फोटाच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये आॅनलाईन घटस्फोटांचा अभ्यास केला असता, त्यातील एकतृतीयांश प्रकरणात फेसबुक हा शब्द वापरला होता. (वृत्तसंस्था)