देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच एका महिलेला आहे. चीनमधील एक महिला सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र हा प्रवास आपलं नशिबच बदलून टाकेल, याची कल्पनाही या महिलेने केली नव्हती. ही महिला बाजारात पोहोचली असतानाच अचानक पाऊस पडू लागला. पावसापासून वाचण्यासाठी ही महिला एका दुकानामध्ये गेली. तिथे गंमत म्हणून तिने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. मात्र तिचं नशीब एवढं जबरदस्त होतं की, तिला त्या तिकिटावर बंपर बक्षीस लागलं. तसेच तिने १ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर जिंकले.
ही घटना दक्षिण-पश्चिम चीनमधील युनान प्रांतामधील युक्सी येथे ८ ऑगस्ट रोजी घडली. येथील एक महिला मुसळधार पावसात अडकली होती. तसेच स्वत:ला वाचवण्यासाठी होंगटा जिल्ह्यातील एका लॉटरीच्या दुकानात घुसली. या महिलेने मी पावसात अडकले आहे. त्यामुळे थोडावेळ खेळते. तुमच्या दुकानात स्क्रॅच कार्ड आहेत का? अशी विचारणा दुकानदाराकडे केली.
त्यानंतर या महिलेने दुकानामधून स्क्रॅच कार्डचं पूर्ण पुस्तकच खरेदी केलं. त्यात सुमारे ३० तिकिटे होती. प्रत्येक तिकिटाची किंमत ३० युआन म्हणजेच ४ अमेरिकन डॉलर एवढी होती. तिला या तिकिट खरेदीसाठी एकूण ९०० युआन एवढा खर्च आला. मात्र त्यातील एका तिकिटावर तिला तब्बल १ लाख ४० हजार अमेरिकन डॉलरची लॉटरी लागली. त्याबरोबरच ती एका झटक्यात करोडपती झाली.
लॉटरी दोन प्रकारची असते. त्यातील एक प्रकारची लॉटरी ही दर दिवशी किंवा दर आठवड्याला जाहीर होते. तर दुसरी स्क्रॅच कार्डच्या स्वरूपात असते. त्यामधून आपल्याला काही बक्षीस मिळालं आहे की नाही हे लगेच समजून जाते.