अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफने जगभरातील व्यापार विश्वावर परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी भारताकडून सर्वाधिक टॅरिफ वसुली सुरू केली असून, त्यावर टीका होत आहे. पण, ट्रम्प यांच्याकडून भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफची वकिली करणे सुरूच आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना भारतावरील टॅरिफचा मुद्दा काढला. ते म्हणाले, "टॅरिफ लावला म्हणूनच मला भारताकडून शून्य टॅरिफ करण्याची ऑफर दिली गेली होती. आता भारतावर आणखी टॅरिफ लावणार नाही. पण, जर मी भारतावर टॅरिफ लावला नसता, तर त्यांनी ही ऑफर दिली नसती."
"मी म्हणालो, आता खूप उशीर झालाय"
"भारताने अमेरिकेतून निर्यात होणार्या वस्तुंवरील टॅरिफ शून्य करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर मी त्यांना म्हटलं की, आता खूप उशीर झालेला आहे. काही लोकांना वाटतं की, अमेरिका भारतासोबत खूप कमी व्यापार करते, पण ते आमच्यासोबत जास्त व्यापार करतात. ते आम्हाला भरपूर सामान विकतात. आम्ही त्यांना खूप कमी वस्तू विकतो", असे ट्रम्प म्हणाले.
अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तुंवर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २५ टक्के टॅरिफ ७ ऑगस्ट रोजी लागू करण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्ट रोजी लावण्यात आला होता.