रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून जन्मदर कमी झाला आहे. यातच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणामही नागरिकांच्या जीवनावर झाला आहे. रशियामध्ये घटत्या लोकसंख्येचा दर रोखण्यासाठी पुतिन प्रशासन अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे. दरम्यान, तेथील सरकारने मुलींसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेची जगभरात चर्चा होत आहे.
'देशातील हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींना गर्भवती झाल्यावर त्यांना रोख प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना राबवली जाईल', असं रशियन सरकारने जाहीर केले आहे. ही योजना देशभरात किंवा काही भागात चालवली जाईल की नाही हे असूनही निश्चित झालेले नाही.
या परिसरात सुरू होणार योजना
द मॉस्को टाईम्स आणि फॉर्च्यूनच्या अहवालानुसार, सरकारने रशियाच्या सायबेरियातील केमेरोवो, करेलिया, ब्रायन्स्क, ओरिओल, टॉम्स्क सारख्या भागात अशा योजना सुरू केल्या आहेत, तिथे शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली किमान २२ आठवड्यांच्या गर्भवती असतील आणि सरकारी प्रसूती दवाखान्यात नोंदणीकृत असतील तर त्यांना १००,००० रूबल (सुमारे १ लाख रुपये) पर्यंत एक-वेळ रोख बोनस दिला जाणार आहे.
लोकांच्या प्रतिक्रिया काय?
रशियन सरकारच्या या निर्णयावर रशियन जनतेच्या दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियन पब्लिक ओपिनियन रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ४३ टक्के रशियन लोक या धोरणाचे समर्थन करतात, तर ४० टक्के लोक त्याचा विरोध करतात. 'किशोरवयीन गर्भधारणेला प्रोत्साहन देणे नैतिक चिंता निर्माण करते' अशी टीका काहीजण करत आहेत, तर समर्थक लोकसंख्या घट रोखण्यासाठी ते एक आवश्यक पाऊल मानतात.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लोकसंख्या वाढीला राष्ट्रीय प्राधान्य दिले आहे. रशिया-युक्रेन युद्धात २,५०,००० रशियन सैनिक मृत्युमुखी पडले. लाखो तरुण देश सोडून गेले आहेत.
फॉर्च्यूनच्या अहवालानुसार, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत रशियामध्ये फक्त ५,९९,६०० मुले जन्माला आली, जी २५ वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी देशाच्या घटत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली होती.