सामना हरण्यासाठी मला २ लाख डॉलरची ऑफर मिळाली होती - नोवाक जोकोविच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 17:04 IST2016-01-18T17:02:12+5:302016-01-18T17:04:04+5:30
फिक्सिंगच्या आरोपांमुळे टेनिस विश्व ढवऴून निघाले असतानाच सध्याचा नंबर एक पुरुष टेनिसपटू नोवाक जोकोविचने टेनिसमध्ये फिक्सिंग होत असल्याच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.

सामना हरण्यासाठी मला २ लाख डॉलरची ऑफर मिळाली होती - नोवाक जोकोविच
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १८ - फिक्सिंगच्या आरोपांमुळे टेनिस विश्व ढवऴून निघाले असतानाच सध्याचा नंबर एक पुरुष टेनिसपटू नोवाक जोकोविचने टेनिसमध्ये फिक्सिंग होत असल्याच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला मॅच फिक्सिंगची ऑफर मला मिळाली होती असा गौफ्यस्फोट जोकोविचने केला आहे.
बीबीसी आणि बझफिडने आजच मागच्या दशकात ग्रँण्डस्लॅम विजेत्यांसह अव्वल सोळा टेनिसपटू फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जोकोविचने केलेला हा खुलासा महत्वपूर्ण आहे.
२००७ मध्ये सेंट पीटसबर्ग येथे पहिल्या फेरीचा सामना हरण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती. माझ्याशी थेट संपर्क साधण्यात आला नाही, पण त्यावेळी जे लोक माझ्यासोबत काम करत होते त्यांच्या माध्यमातून मला ऑफर देण्यात आली होती असे जोकोविचने मेलबर्न येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सामना हरण्यासाठी जोकोविचला २ लाख डॉलरची ऑफर देण्यात आली होती. कोणी म्हणेल की, मला चालून आलेली ही संधी होती. पण हा खिलाडूपणा नाही, खेळामधला गुन्हा आहे मी अशा गोष्टींचे समर्थन करु शकत नाही असे जोकोविच म्हणाला.
टेनिससह कुठल्या खेळामध्ये अशा प्रकारांना थारा देऊ नये, मला नेहमीच क्रीडा मूल्यांचा आदर करायला शिकवले आहे आणि मी खेळाचा आदर करणा-या लोकांमध्ये राहीलो आहे असे जोकोविचने सांगितले.