रशियाने काल रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये देशातील विविध शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. या भयानक हल्ल्यात झायटोमिरमध्ये तीन मुलांसह १३ लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. कीव, खारकिव, मायकोलायव्ह, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की यांसारख्या प्रमुख शहरांवर हल्ला झाला.
युक्रेनच्या हवाई दलाने २६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्र पाडली, परंतु असं असूनही अनेक अपार्टमेंट इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झालं आहे. हा युद्धातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. राजधानी कीवमध्ये ११ जण जखमी झाले. तसेच खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी झालेल्या आणखी एका मोठ्या ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लगेचच हा हल्ला झाला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अमेरिकेच्या कमकुवत प्रतिसादावर टीका केली आहे आणि रशियाविरुद्ध कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.
"दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्र पाश्चात्य देशांमध्येही अशाच प्रकारच्या नरसंहाराची तयारी करतील. मॉस्कोकडे शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे तोपर्यंत तो लढेल” असं युक्रेनच्या राष्ट्रपतींचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई यरमाक यांनी टेलिग्रामवर म्हटलं आहे. रशियाने दावा केला की, त्यांनी अवघ्या चार तासांत युक्रेनचे ९५ ड्रोन पाडले आहेत, त्यापैकी १२ मॉस्कोजवळ होते.