चार्ली हेब्दोवरील हल्लेखोरांना पाकमध्ये श्रद्धांजली
By Admin | Updated: January 14, 2015 09:49 IST2015-01-14T09:45:43+5:302015-01-14T09:49:58+5:30
पाकिस्तानमधील पेशावर येथे चार्ली हेब्दोवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनाच श्रद्धांजली वाहिल्याचा प्रकार समोर आला आहे.

चार्ली हेब्दोवरील हल्लेखोरांना पाकमध्ये श्रद्धांजली
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. १४ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकावरील दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असतानाच पाकिस्तानमधील पेशावर येथे चार्ली हेब्दोवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनाच श्रद्धांजली वाहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रार्थनासभेत सुमारे ६० जणांनी हजेरी लावल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.
चार्ली हेब्दो या उपहासात्मक मासिकाच्या पॅरिसमधील कार्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जणांची हत्या करण्यात आली होती. प्रेषित मोहंमद यांचे व्यंगचित्र छापल्याने चार्ली हेब्दोवर हल्ला करण्यात आला होता. चार्ली हेब्दोवर हल्ला आणि तब्बल तीन दिवस पॅरिसमधील अन्य भागांमध्ये अंधाधूंद गोळीबार करणा-या सईद कुआशी आणि चेरिफ कुआशी या दोघा भावंडांना फ्रेंच सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते.
चार्ली हेब्दोवरील हल्ल्याचा जगभरात निषेध होत असतानाच पाकिस्तानमधील पेशावर येथे स्थानिक धर्मगुरु मौलाना पीर मोहम्मद चिश्ती यांच्या नेतृत्वाखाली कुआशी बंधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या दोघांनी मुसलमांनाचे कर्ज चुकते केले असून आम्ही त्यांना सलाम करतो, ते दोघे 'शहीद' झाले आहेत अशी मुक्ताफळ चिश्ती यांनी उधळली. याप्रसंगी चार्ली हेब्दोविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यात पेशावरमधील लष्करी शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४० जणांचा मृत्यू झाला होता.