अपहृत पाकिस्तानी महिला पत्रकाराची सुखरूप सुटका, दोन वर्षे बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:46 IST2017-10-22T00:46:05+5:302017-10-22T00:46:23+5:30
एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे.

अपहृत पाकिस्तानी महिला पत्रकाराची सुखरूप सुटका, दोन वर्षे बेपत्ता
लाहोर : एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. त्या १९ आॅगस्ट २०१५ पासून त्या बेपत्ता होत्या.
लाहोरमधील घरून कार्यालयाकडे आॅटोरिक्षाने जात असताना अज्ञात लोकांनी त्यांचे अपहरण केले होते. त्या डेली नई खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनेलच्या पत्रकार आहेत. भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांच्या प्रकरणाचा त्या पाठपुरावा करीत होत्या. अन्सारी २०१२ मध्ये बेपत्ता झाले होते.
बेपत्ता व्यक्ती चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले की, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेलगतच्या भागातून झिनत यांची गुरुवारी रात्री सुटका करण्यात आली. झिनत शहजादी (२६) या लाहोरमधील आपल्या कुटुंबीयांत सुखरूप पोहोचल्या आहेत. त्यांची सहीसलामत सुटका करण्यात आल्याचा आम्हाला आनंद वाटतो. त्या आता घरी सुखरूप पोहोचल्याने खूश आहेत, असे मानवी हक्क कार्यकर्त्या बीना सरवर यांनी म्हटले आहे. झिनत यांचे अपहरण झाल्यामुळे नैराश्यातून त्यांचा भाऊ सद्दाम याने मागच्या वर्षी आत्महत्या केली होती. (वृत्तसंस्था)