पाकमध्ये हाय अलर्ट; २१ गजाआड
By Admin | Updated: November 4, 2014 02:08 IST2014-11-04T02:08:53+5:302014-11-04T02:08:53+5:30
वाघा सीमेवर रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, एका आत्मघाती हल्लेखोरासह २१ संशयिताना आज ताब्यात घेण्यात आले

पाकमध्ये हाय अलर्ट; २१ गजाआड
लाहोर : वाघा सीमेवर रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर, एका आत्मघाती हल्लेखोरासह २१ संशयिताना आज ताब्यात घेण्यात आले असून, स्फोट झालेल्या भागात आणखी बॉम्ब व स्फोटके भरलेले जाकीट आढळल्यानंतर संपूर्ण देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी झालेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा आता ६१ वर गेला आहे.
पंजाब रेंजरच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्फोटके व आत्मघातकी हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे स्फोटके भरलेले जाकीट घटनास्थळी सापडले. आत्मघाती जाकिटात स्फोटके व बॉल बेअरिंग भरलेली होती. बॉम्बनाशक पथकाने ती निकामी केली. लाहोर शहरात मोहरम मिरवणुकाही असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहोरपासून ३५० कि.मी. वर असलेल्या मूलतान येथे एका संशयित आत्मघाती हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी रविवारी १७ वर्षाच्या अब्दुल रेहमान याचे चित्र प्रसिद्ध केले होते. तो लाहोरमधून गेल्या महिन्यात बेपत्ता झाला होता. मूलतान जिल्ह्यात एका घरावर छापा टाकून या अब्दुल रेहमान याला पकडण्यात आले.
रविवारी झालेल्या हल्ल्यात ६१ लोक मरण पावले असून, त्यात १० महिला व ८ मुले आणि तीन सुरक्षा कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)